मुख्यमंत्री यांच्या दावोस दौऱ्यात गुंतवणूक केलेले उद्योजक परदेशातील नाही तर हैदराबादचे – खासदार सुप्रिया सुळे

पुणे, १९ जानेवारी २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दावोसचा दौरा केला आणि आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक हे परदेशातील नव्हे तर हैदराबादचे असून त्यांच्याशी करार करण्यासाठी स्विझरलँड मधील दावोस येथे जाण्याची गरज नव्हती. मुंबईत बसूनही उद्योजकांना बोलावले असते तर, करार झाले असते. मुख्यमंत्री यांनी त्यांचे दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरवारी पत्रकार परिषदेत लगावला आहे.

पुणे मनपा येथे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या,लोकशाही मध्ये सत्त्तेचे विकेंद्रीकरण माध्यमातून कामाचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, सध्या सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक सरकारने लवकर घेतल्या पाहिजे . सत्ताधारी हे त्यांच्या फायद्यासाठी लवकर निवडणूक घेत नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नसल्याने लोक त्यांचे प्रश्न कुठे घेऊन जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन नागरिकांना वेळ देत मागू त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. नगरसेवक प्रशासनाकडे दाद मागू शकत नाही. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बाबत महविकास आघाडी यांची अंतर्गत बैठक होऊन त्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल.
पुढे त्या म्हणाल्या, केंद्र सरकारचा डेटा नुसार मागील तीन वर्षात सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्र मध्ये सुरू झाले आहे. याकाळात अडीच वर्ष सरकार महविकास आघाडीचा होते. त्यात सर्वाधिक उद्योग पुणे मध्ये सुरू झाले ही अभिमानाची बाब आहे. मात्र, सध्या पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली असून कोयता गँग ची गुन्हेगारी ही मागील तीन ते चार महिन्यात समोर आले आहे. चाकण औद्योगिक परिसरातून कोणता प्रकल्प राज्याबाहेर जात नाही. उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांचा प्रकल्प विस्तारित करत असून चाकण मध्ये ते नवीन उद्योग लवकरच निर्माण करतात. पुणे हा मोठा जिल्हा असून सक्षम पोलीस यंत्रणा असतानाही गुन्हेगारी वाढलेली आहे.

मंत्री अब्दुल सत्तार हे बारामती दौऱ्यावर येत आहे याबाबत सुळे म्हणाल्या, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणाची बातमी होत नाही. त्यामुळे आमच्याबद्दल कोण बोलत असेल तर ते ऐकून घेण्यास आम्ही दिलदार आहे.

नरेंद्र मोदी शिवाय भाजपला पर्याय नाही

भाजप जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय दुसरा पर्याय सध्या नाही. पूर्वी भाजपकडे भक्कम नेत्यांची फळी होती परंतु तशी फळी आत्ता दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधान यांची मला काळजी वाटते की, ग्राम पंचायत निवडणूक ते संसद निवडणुकीसाठी त्यांना सर्वत्र पळावे लागत आहे.
शिवसेना पक्षाची स्थपना ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीत दहा वर्ष उद्धव ठाकरे हे उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्यांनी कारभार पहिला. त्यामुळे तुम्हाला वेगळा विचार असेल तर वेगळे पर्याय शोधा आणि त्यानुसार वेगळी वाटचाल करा आणि दुसऱ्याचे गोष्टीवर हक्क गाजवू नका असा टोला सुळे यांनी लगवाला.

जी २० बैठक बाबत कल्पना नाही

सुळे म्हणाल्या, जी २० बैठक कशासाठी होती हेच मला माहिती नाही. पुणे शहराला काय फायदा झाला, त्यांचा अजेंडा काय होता, त्यात काय विषय चर्चिले गेले याबाबत आम्हाला कोणतीच कल्पना नाही. या परिषदेच्या बैठकीस लोकप्रतिनिधी यांना ही बोलवण्यात आले नाही. प्रसारमाध्यमात ज्या बातम्या आल्या त्यातूनच आम्हास थोडीफार माहिती मिळाली आहे.