मराठवाड्याच्या विकासावरून दाणवेंनी फडणवीसांना घेरले
संभाजीनगर, १५ सप्टेंबर २०२३ : संभाजीनगरमध्ये उद्या (ता. १६) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल १४० रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत आहे. त्यामुळे ही बैठक चर्चेत आली आहे. या बैठकीआधीच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मधील बैठकीत केलेल्या घोषणांची यादी वाचून दाखवत टोचणारे सवाल केले आहेत.
दानवे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. परंतु, ज्यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण आहेत, असे दानवे म्हणाले. सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत. त्यांनी इतर अवास्तव घोषणा करण्यापेक्षा स्वतः केलेले काम पूर्ण करावे असे दानवे म्हणाले.
यावेळी दानवे यांनी फडणवीस यांनी केलेल्या घोषणांची यादीच वाचून दाखवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?, नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित केलेले २५० कोटी कुठे आहेत?, लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते, त्याचं काय झालं?. सिंचन प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देणार होतात?, कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेसाठी ४८०० कोटी देणार होतात?, विमानतळ विस्तारीकरणासाठी २०० कोटींची घोषणा केली होती?, २५ हजार हेक्टर फळबागा उभारण्यासाठी ३७५ कोटींची कबुली होती.
जालन्यात सीडपार्कसाठी १०९ कोटींचा वायदा होता. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २८२६ कोटी निधी देणार होतात त्याचे काय झाले?, परभणीत ६८ एकरावर टेक्सटाइल पार्क उभारणार होतात त्याचे काय झाले?, असे सवाल करत दानवे यांनी फडणवीसांच्या घोषणांची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे आता पुन्हा औरंगाबादेत येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण, आपल्या खोकेबाजीची धोकेबाजीची नोंद तब्बल ३२ देश घेत असतात, असा खोचक टोलाही दानवेंनी लगावला.