पुण्याची जागा काँग्रेसच लढविणार

पुणे, २० जानेवारी २०२४ः आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून २० जणांनी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी कोणाचे नाव फायनल होणार किंवा बाहेरून आयात उमेदवार मागणार हे योग्य वेळीच कळेल. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे आहे. अन्य पक्षांनी येथे मागणी केली तरीही आम्ही जागा सोडणार नाही. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढले अशी भूमिका शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक मंगळवारी (ता. २३) पुण्यात कॉंग्रेस भवन येथे होत आहे. कॉंग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे दीड हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी ॲड.अभय छाजेड, संगीता तिवारी, अजित दरेकर, द.स.पोळेकर आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेस पक्षाकडेच आहे. त्यादृष्टीने शहर कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते बूथ पातळीपर्यंत सर्व स्तरावर कॉंग्रेस पक्षाने तयारी केलेली असून पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा दावा शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला. ईव्हीएमबाबत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही शंका व्यक्त केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी ही शंका दूर करण्यासाठी एकदा ईव्हीएम बाजूला ठेवून निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हानही शिंदे यांनी दिले.

कॉंग्रेस भवन येथे होणाऱ्या या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबरोबरच पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे देखील उपस्थित असणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पाचशे पदाधिकारी व एक हजार कार्यकर्त्यांचा या बैठकीत सहभाग असेल. संबंधित बैठकीमध्ये चेन्नीथला यांच्याकडून शहर, जिल्हा, ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. बूथ कमिट्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप