भाजप विरोधी आघाडीला सकारात्मक प्रतिसाद मिळेना – शरद पवार विधान

कोल्हापुर, २८ जानेवारी २०२३ : विरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखं काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात पत्रकारपरिषद झाली यावेळी त्यांनी विविध मुद्य्यांवरील प्रश्नांवर उत्तरं दिली. मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नास उत्तर देताना शरद पवारांनी एक मोठं विधान केलं. विरोधकांची मोट बांधण्यासाठी आपल्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी काम करत आहेत, त्याची सध्या काय स्थिती आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून विचारण्यात आल्यावर शरद पवार म्हणाले, आघाडी करताना काही ना काही तरी स्थानिक मुद्दे आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी व अन्य सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथे आहे. पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकुल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होईल. सगळेच लोक भेटतील आणि त्यामुळे हा संवाद सुरू करता येईल.”

याशिवाय पवारांनी यावेळी सी-व्होटर सर्वेच्या अंदाजावरही प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “ही जी एजन्सी आहे, त्यांची अचूकता ही यापूर्वी बरीच सिद्ध झाली. पण मी एकदम त्यामध्ये जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतं आहे.”

देशभरात काँग्रेसच्या जागा वाढतील असं सर्वेमध्ये दिसतं आहे, यावर शरद पवार म्हणाले, “दिसतय ना, आता उदाहरणार्थ कर्नाटकचा सर्वे वेगळा आहे पण त्याची आम्ही सखोलपणे घेतली त्यामध्ये आम्हाला स्पष्ट असं दिसतं की कर्नाटकात भाजपाचं राज्य राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. असंच चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्तावाचा भाग आहे, त्याची नेमकी माहिती आमच्याकडे नाही.”

इंडिया टुडे आणि सी व्होटर(मूड ऑफ नेशन)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एनडीएला झटका बसू शकतो. रिपोर्टनुसार याचा थेट परिणाम महाराष्ट्रात शिंदे-भाजपा युतीवरही होईल. सर्वेनुसार या युतीचं आगामी लोकसभा निवडणूक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.