शिक्षकांनो, आता उघडा तुमच्या पसंतीच्या बँकेत खाते!

नागपूर, २०/१२/२०२३: राज्यातील सर्व शिक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार तसेच पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणार, असा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः अहमदनगर व जळगावसह अनेक जिल्ह्यांतील शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी हा प्रश्न सरकारकडे मांडला आणि अथक प्रयत्नांनंतर यश आले आहे.

राज्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा पगार ठरावीक बँकांमध्ये जमा होतो. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना संबंधित बँकेतच पगाराचे खाते उघडावे लागते. सध्या अनेक बँकांकडून अपघात विमाविषयक लाभ, इतर योजना राबवल्या जातात. अधिकारी व कर्मचारी यांच्या फायद्याच्या या योजना वेतन खात्याशी जोडलेल्या असतात. विशेष म्हणजे त्यासाठी बँका कोणतेही जास्तीचे पैसे आकारत नाहीत. त्यामुळे सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेच्या बँकेत खाते उघडण्याची मुभा असावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी वारंवार केली होती. या मागणीला यश आलं असून आता याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे.

या शासन निर्णयानुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार जमा होण्यासाठीचे खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँक किंवा कोअर बँकिंग असलेल्या इतर बँकांमध्ये उघडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल, अशी प्रतिक्रिया आ. तांबे यांनी दिली.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप