जरांगेंबरोबरची चर्चा सरकारकडून बंद?

नगर, १६ जानेवारी २०२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्याबरोबरची चर्चा सध्या सरकारने थांबवल्याचे दिसत आहे. येत्या २० जानेवारीला मुंबईकडे पदयात्रा निघेपर्यंत चर्चेची दारे खुली राहतील, असे जरांगे यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, दोन जानेवारीच्या ऑनलाइन बैठकीनंतर या दोघांत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे दिसून येते.

एकीकडे मुंबईला निघण्याची सकल मराठा समाजाची ठिकठिकाणी तयारी सुरू असताना दुसरीकडे पोलिस आणि प्रशासनही यासाठीच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. पदयत्रा मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोलिस आणि सकल मराठा समाजाच्या संयुक्त बैठका सुरू आहेत. यावरून सरकारने आंदोलनाला समोरे जाण्याची तयारी ठेवल्याचे दिसून येत आहे.

जरांगे यांच्यातील शेवटची चर्चा ऑनलाइन बैठकीत झाली. त्यामध्येही समाधानकारक तोडगा न निघाल्याने मुंबईकडे जाण्याचे घोषित करून जरांगे यांनी तयारी सुरू केली. तशीच तयारी आता पोलिसांनीही सुरू केली आहे. पदयात्रेसाठी बंदोबस्त देण्यासोबतच नियोजनातही पोलिसांनी लक्ष घातले आहे. ही यात्रा नगर जिल्ह्यातून जाणारआहे. सुमारे सव्वाशे किलोमीटर अंतर जिल्ह्यातून कापणार आहे. यात नगरजवळ बाराबाभळी येथील एका मदरशाच्या मैदानावर मुक्काम नियोजित आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाने नियोजन सुरू केले. पोलिसांनीही अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समजासोबत बैठका घेऊन नियोजन केले. मुक्काम आणि यात्रेचा प्रवास असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.