काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

मुंबई, १५ जानेवारी २०२३ : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून सुद्धा डॉक्टर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही व त्याबाबत पक्षाला अंधारात ठेवले. मात्र, दुसरीकडे स्वतःचा मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरून बंडखोरी केल्याने सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबन करण्यात आलेले आहे पक्ष शिस्तीचा भंग केल्याने चौकशी होईपर्यंत त्यांची हे निलंबन कायम असेल. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली.

डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या या चौकशीचे आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  सुधीर तांबे यांची नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने सुधीर तांबे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता सुधीर तांबे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.