शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने सुषमा अंधारे यांच्या दोन कानाखाली लावल्या, बीड मधील धक्कादायक प्रकार
बीड, १९/०५/२०२३: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना घडली आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाल्याची माहिती आहे. सुषमा अंधारे या शिवसेनेकांकडे हप्ते मागत असल्याने व दादागिरी करत असल्याने जिल्हाध्यक्ष जाधव यांनी अंधारे यांना दोन कानाखाली लावल्याचा व्हिडिओ खुद्द जाधव यांनीच व्हायरल केला आहे.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये २० मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी बीडमध्ये सुरू आहे. कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे गुरुवारी सायंकाळी पोहचले.
अधिक वाचा दोन्ही विरोधक ‘गुरुदेवांसाठी’ एकत्र आले, मात्र एकमेकांकडे कटाक्षही टाकला नाही
यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर हे प्रकरण मारामारीपर्यंत गेले. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेल्या वरेकर यांनी जाधव यांची गाडी फोडली. यामुळे काही काळ कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या वादानंतर अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. ‘शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत, पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागतात. कोणाकडून एसीसाठी, तर कोणाकडून फर्निचरसाठी पैसे मागतात. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. मी रक्ताचं पाणी करुन जिल्ह्यात पक्ष वाढवत आहे. लेकरा बाळांच्या मुखातला घास काढून खर्च करतोय.’ असं जाधव म्हणाले.