सुनील टिंगरेला माज चढलाय – पोर्शे प्रकरणावरून पवारांची टीका
पुणे, २७ सप्टेंबर २०२४: ‘‘तुला संधी कोणी दिली, तेव्हा पक्षाचा नेता कोण होता, कोणाच्या नावावर तु मते मागितली. पण अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी तू पोलिस ठाण्यात गेलास. दोघांची गाडीखाली हत्या झालेली असतानाही तू चुकीच्या बाजूला उभा राहिलास. सत्तेचा माज चढला आहे. या घटनेची शरम न वाटता पुन्हा दमदार आमदार म्हणून हा दिवट्या आमदार निवडणूक लढवत आहे, अशा शब्दात पोर्शे प्रकरणात अग्रवाल कुटुंबाला मदत करणारे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगेर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्ला चढवला.
खराडी येथील पक्षाच्या महानिर्धार मेळावा आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार बापू पठारे यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनी पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार अशोक पवार, रोहित पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ॲड जयदेव गायकवाड, जग्गनाथ शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याणीनगरयेथे पोर्शे कारच्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू झाला, हे प्रकरण देशभर गाजले. पण आरोपींना मदत करणाऱ्या आमदार टिंगरेवर कोणतीही कारवाई झाली नाही. हा मुद्दा शरद पवार यांनी आजच्या सभेत उपस्थित केला. रस्त्यावर दमदार आमदार असे टिंगरेंचे फलक लागल्याचे पहायला मिळाले. हा टिंगरे माझ्या नावावर, माझ्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला आहे, पण मोठा अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करता पोलिस ठाण्यात जातो. अशा पद्धतीने जनतेचे उत्तरदायित्व फेडतो असे सांगत पवारांनी टिंगरेंना घेरले. पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत टिंगरेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. तरीही हा दिवट्या आमादार तुमच्याकडे मत मागण्यासाठी येत आहे. त्याचे काय करायचे ते तुम्ही ठरावा असे सूचक वक्यव्य पवार यांनी करत टिंगरे यांच्या विरोधात प्रचार केला.