सर्व काही सुप्रिया सुळेंसमोर ठरल्याचा दाव्यावर सुळेंनी दिले प्रत्युत्तर

मुंबई, ५ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या अजित पवार यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावरही दावा सांगितला. तसंच आम्ही वरिष्ठांशी बोलूनच हा निर्णय घेतला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता या सगळ्याविषयी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवारांना या बंडाची कल्पना होती का? या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही सुप्रिया सुळेंसमोरच सगळं ठरलं असा दावा केला होता. त्याचंही उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

“मी रविवारी (२ जुलै) अजित पवारांना भेटले होते. आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर पक्षाचे आमदार तिथे दादाला (अजित पवार) भेटायला येऊ लागले. मला वाटलं निवडणुकीची तयारी कशी करायची याची चर्चा करायला आले असावेत. दादाच्या मनात नेमकं काय चाललं आहे मला ठाऊक नव्हतं. मी तिथून निघाल्यानंतर त्याच्याकडे आलेले समर्थक आमदार आणि दादा (अजित पवार) हे राजभवनावर पोहचले.” असं आता सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या देवगिरी बंगल्यावर मी जेव्हा अजित पवारांना भेटले तेव्हा आमची एका विषयावर चर्चाही झाली. काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी विरोधी पक्षनेते पद मला नको मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आम्ही जेव्हा बोललो तेव्हा पुढे काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.

अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवार आहेत का?

अजित पवारांनी शरद पवारांना सांगूनच या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का? या आशयाचा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवारांच्या निर्णयाची शरद पवारांना काहीही कल्पना नव्हती. त्यांना पुसटशी कल्पना जरी आली असती तर त्यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याची मोहीम सुरु केली नसती. बंड कलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात कारवाई सुरु केली नसती असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केल्याने आपण निराश झालो आहोत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच शरद पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय झाला आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दावा केला होता की सुप्रिया सुळेंसमोरच सगळ्या गोष्टी ठरल्या. मात्र त्यांनी हा दावा फेटाळला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप