विद्यार्थी, तरुण शहरी नक्षलवाद्यांचे लक्ष्य -देवेंद्र फडणवीस

पुणे, २७ मे २०२३ ः “”भारताबरोबर केवळ सीमेपलिकडील आतंकवादीच लढत नाहीत, तर या देशात राहून त्यांचे काही साथीदार छुप्या पद्धतीने लढा देत आहेत. याच माओवाद्यांविरुद्ध लढताना आमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या, बंदुक घेऊन लढणाऱ्या माओवाद्यांना आता नवीन लोक मिळत नाहीत. अशा विचारांना प्रदूषीत करणाऱ्यांची संख्या वाढत असून शहरी नक्षलवादी कॉलेज, विद्यापीठांमध्ये जाऊन देश, संस्कृती व संस्काराविरोधी विषाणू विद्यार्थी, तरुणांच्यात पसरवित आहेत. त्याद्वारे देश तोडण्याचे बीजारोपण ते करीत असून त्याविरुद्ध आता लढाई लढावी लागेल, ” असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनिमित्त नागरीक अभिवंदन समारंभ आयोजित केला होता. यावेळी लष्करप्रमुख (निवृत्त) एम.एम नरवणे, उद्योजक बाबा कल्याणी, राजशरण साई, याज्ञवल्क शुक्‍ल, बागेश्री मंठाळकर, अंकीता पवार आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “”भारत पुर्वी याचकाच्या भुमिकेत असे, आता मात्र भारत एक मजबुत देश म्हणून जगापुढे येत आहे. आमची ताकद एकीकडे वाढलेली असतानाच, दुसरीकडे छुपेयुद्ध करण्याचा प्रकार सुरु आहे. आज भारताच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारील शत्रुराष्ट्रालादेखील चुकीचा विचार करण्यापुर्वी दोनदा विचार करावा लागत आहे. मात्र याच ताकदीमुळे भारताबरोबर एक छुपेयुद्ध लढले जात आहे. हे युद्ध केवळ सीमेपलिकडील आतंकवादी लढत नाहीत, तर त्यांचे काही साथीदार आपल्या देशातही हे युद्ध लढत आहेत. शहरी नक्षलवाद्यांची विचारधारा विद्यार्थी, तरुणांच्या डोक्‍यात विषाणू निर्माण करण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थेविरुद्ध लढा देत असल्याचे चित्र ते निर्माण करीत आहेत. प्रत्यक्षात कॉलेज, विद्यापीठांमधील तरुणाच्या डोक्‍यात व्यवस्था, संस्कृती व संस्कार याविरुद्ध बिजारोपण करीत आहे. राष्ट्रभावनेने प्रेरीत होण्यासाठी आत्मकेंद्री पिढी नको, तर राष्ट्राचा विचार करणारे तरुणांची गरज असून तेच देशाला पुढे नेतील.”

नरवणे म्हणाले, “” भारताच्या अर्थप्रगती झपाट्याने पुढे जात आहे. जगात अमेरीका, चीन व जपान या देशानंतर भारताचा दरडोई उत्पन्नामध्ये चौथा क्रमांक लागतो. काही वर्षातच आपण जपानला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावू. आपल्या देशात सर्वाधिक तरुण असून या मनुष्यबळाला शिस्त व कौशल्य शिकविण्याची आवश्‍यकता आहे. युवावर्गामध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्याची गरज आहे. देशाची सुरक्षितता सध्या केवळ लष्कराच्या खांद्यावर आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढते धोके लक्षात घेऊन आपण आहे, त्याच क्षेत्रामध्ये अधिकाधिक योगदान देत राष्ट्रीय सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडू शकता. राष्ट्रीय सुरक्षितता ही फक्त लष्कराचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरीकाची असून प्रत्येकजण आपल्या कामातून राष्ट्रीय सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडु शकतो.”

बाबा कल्याणी म्हणाले, “”भारतात पुर्वी युद्धसामुग्री आयात करावी लागत होती, आता आपण मित्रराष्ट्रांना ही युद्धसामुग्री निर्यात करत आहोत. कोणत्याही देशाची ताकद हि त्याच्या युद्धसामुग्री निर्मितीवर अवलंबनू असते. हि संरक्षण सिद्धता साध्य करण्याचे काम भारताने केले आहे. त्यास आम्ही काही प्रमाणात हातभार लावू शकलो, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अनेक तरुण कामगार, अभियंते आमच्याशी जोडले गेले आहेत. सशक्त भारत, आत्मनिर्भर भारत तयार करण्याचे काम आपण आत्तापर्यंत केले आहे, आता देशातील तरुणांच्या हातात देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे.”