विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राला मोठे वैभव मिळवून देण्याची क्षमता – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, 05 नोव्हेंबर 2022: विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राला आणखीन उंचीवर नेण्यासाठी, मोठे वैभव मिळवून देण्यासाठी झेप घेण्याची क्षमता आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकजुटीने निर्धार करुन प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

म्हाळुंगे येथील आदित्य इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक स्न्हेसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यामुळे शिक्षकांना न्याय मिळण्यासोबतच त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. आगामी काळात शिक्षण क्षेत्रात कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने निर्धार करुन राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य प्रगतीपथावर असताना चांगले उद्योग उभारण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ते कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य अनेक शिक्षण संस्था करीत आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यामुळे आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी आवश्यक ते बदल शिक्षण क्षेत्रात करण्यात येतील, असेही श्री. केसरकर म्हणाले.

आर्थिक बाबींचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये, याकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत अर्धवट राहता कामा नये यासाठी शालेय शिक्षण विभाग व शिक्षण संस्थांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

व्यवसायिक शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी व्यवसायिक शिक्षण द्यावे. विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतीय नागरिक तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करीत आहे. ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आरोग्य अशाप्रकारे एकूणच व्यक्तीमत्व विकास करण्याच्यादृष्टीने शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. केसरकर यांनी केले.