पहाटेचा शपथविधीचा विषय आता थांबवा : संजय राऊत
मुंबई, ३१ जानेवारी २०२३: एकीकडे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे अनुक्रमके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पहाटेचा हा शपथविधी कायम चर्चेचा विषय असतो. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली, असे विधान केले. याच पहाटेच्या शपथविधीवर आता ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. ही वेळ सगळं काही जाहीर करण्याची नाही. अजित पवार आत्मचरित्र लिहितील. त्यामध्ये सर्वकाही असेल, असे राऊत म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
अजित पवार यांनी कोणाच्या म्हणण्यानुसार पहाटे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हाच प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर म्हणून “शरद पवार यांनी सांगितले आहे, की त्या गोष्टीला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे तो अध्याय आता संपलेला आहे.
जेव्हा अजित पवार त्यांचं आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. ही वेळ ते सगळं काही जाहीर करण्याची नाही. शरद पवार यांनी जे काही सांगितलेले आहे, ते पुरेसे आहे. त्या घटनेला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय काढण्यात अर्थ नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीबाबत महत्त्वाचे भाष्ये केले होते. “त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही”, असं जयंत पाटील म्हणाले होते. यानंतर या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
२०१९ सालच्या राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राजकीय तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून बेबनाव झाल्यामुळे युतीचं सरकार पुन्हा येणार नसल्याचं दिसू लागलं होतं. त्याचवेळी अचानक अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांसमवेत शपथविधी उरकल्याचा राजकीय भूकंप झाला. या शपथविधीनंतर पुढील तीन दिवस अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी राजीनामा दिला होता.
त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचं सरकार ठरलेलं फडणवीस सरकार कोसळलं. त्यानंतर अजित पवारांच्या या कृतीचं गूढ अद्यापपर्यंत कायम आहे. दोन्ही बाजूंनी त्यावर कोणतंही सविस्तर कारण देण्यात आलेलं नाही.