विधानसभेसाढी उमेदवारांची जुळवाजुळव सुरू करा : जरांगे

जालना, ५ आॅगस्ट २०२४ : विधानसभेची आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी. उमेदवारी द्यायचे किंवा कसे यावर २९ ऑगस्टला निर्णय होणार आहे. त्यामुळे धावपळ नको म्हणून संबंधितांनी तयारीला लागावे. सर्वासमक्ष चर्चा करून उमेदवार ठरवू त्यासाठी १४ ते २० ऑगस्टदरम्यान प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन मनोज जरांगे यांनी आज समाजबांधवांना केले.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “आरक्षणासंबंधी शासनाला मागण्यांवर निर्णयासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सरकारने आरक्षण द्यावे, मागण्या मंजूर कराव्यात. आरक्षणाच्या आडून राजकारण करायचे नाही. अँड. प्रकाश आंबेडकर काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. मी व समाजाने त्यांचा नेहमी आदर केला आहे. मी आरक्षणावर ठाम आहे. धनगर व मराठा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत. खचून न जाता ताकदीने उभे राहीले पाहिजे. धनगर समाजालाही ‘एसटी’मध्ये आरक्षण नक्की मिळणार आहे. त्यासाठी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली होती का हे पाहणे गरजेचे आहे. आरक्षणाची आशा सोडली नाही. आरक्षण आंदोलन व निवडणुकीबाबतच विचार सुरूच आहे. वर्षापासून आरक्षण लढा सुरू आहे, ही सोपी गोष्ट नाही,” असेही ते म्हणाले.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार प्रवीण दरेकर माझ्या बदनामीसाठी अभियानात राबवीत आहेत. कितीही बदनामी केली तरी मागे हटणार नाही आणि त्यांचे अभियानात यशस्वी होणार नाही,” असेही जररांग म्हणाले.

राणेंच्या धमकीला घाबरत नाही
“खासदार नारायण राणे यांना मराठवाड्यात यायचे नाही, असे मी म्हटले नाही. त्यांचा नेहमी आदर केला आहे. तरीही ‘मी मराठवाड्यात येणार, जरांगे काय करतो ते बघतो’, अशी धमकी ते देत असतील तर त्यांच्या धमकीला घाबरत नाही. मी बोलू लागलो तर त्यांना कोकणातही फिरणे मुश्कील होईल. त्यांचा मुलगा, आमदार नीलेश राणे यांनी त्यांना समजून सांगावे,” असेही जरांगे म्हणाले.

उमेदवार अपक्ष म्हणून लढतील
“आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही, आघाडीत जाणार नाही. निवडणूक लढविण्याची वेळ आली तर आमचे उमेदवार अपक्ष म्हणून पुढे येतील. आम्हाला राजकीय बस्तान बसवायचे नाही तर गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यायचा आहे. आरक्षणासाठी लढायचे आहे, त्यापासून मागे हटणार नाही. निवडणुकीमध्ये मतदारांना त्रास होईल, अन्याय होईल, पण तो सहन करा. आपल्या विचाराचे उमेदवार निवडून द्या, ” असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप