“राहुल गांधींना कोणीतरी समजावून सांगायला हवे” – संजय राऊत
मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ः , ‘‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’’ राहुल गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा विषय काढला आणि गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शेगावच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांबद्दल मौन बाळगले, हे एका अर्थाने योग्यच झाले. तरीही त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता?,” अशी विचारणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातून केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यातील भाजपा नेते यानिमित्ताने काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेलाही लक्ष्य करत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोकच्या माध्यमातून भाजपाला उत्तर दिलं आहे. तसंच अशाने भारत कसा जोडणार? अशी विचारणाही राहुल गांधींना केली आहे.
रोखठोकमध्ये काय म्हटलं आहे?
“वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला. सावरकरांनी १० वर्षे अंदमानच्या काळय़ा पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी १० वर्षांपेक्षा जास्त काळ नरकयातना भोगल्या त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच, हे श्री. राहुल गांधी यांना कोणीतरी समजावून सांगायला हवे. सावरकरांनी सुटकेसाठी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा अजेंडा नव्हता आणि महाराष्ट्रात तर हा अजेंडा असताच कामा नये. महाराष्ट्रात येऊन श्री. राहुल गांधी यांनी प्रश्न केला, ‘‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’’ राहुल गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा विषय काढला आणि गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शेगावच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांबद्दल मौन बाळगले, हे एका अर्थाने योग्यच झाले. तरीही त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
“मी स्वतः तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होतो. या तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यवीरांचा मुक्काम १९४७ पर्यंत होता. त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक स्तंभही ऑर्थर रोड तुरुंगात आहे. एक सामान्य बंदी म्हणून तुरुंगात दिवस काढणेही कठीण असते. वीर सावरकरांनी तर अंदमानात १० वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला. बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात किंवा मनीलाँडरिंग प्रकरणाचा खोटा गुन्हा लादून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली नव्हती. भारतमातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्यासाठी त्यांना अंदमानचे काळे पाणी भोगावे लागले,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
“दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्यामुळे २३ डिसेंबर १९६० रोजी म्हणजे कारावासाची ५० वर्षे पूर्ण झाल्यावर सावरकरांची सुटका होणार होती. सावरकरांचे बंधू नारायणरावांची बिनशर्त तर वीर सावरकरांची सशर्त मुक्तता झाली. त्यास ‘माफी’ म्हणता येणार नाही. य. दि. फडके यांनी ‘शोध सावरकरांचा’ या ग्रंथात या माफी प्रकरणावर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकला आहे. १ व २३ ऑगस्ट १९२३ रोजी वीर सावरकरांनी सुटकेसंबंधी सरकारकडे अर्ज पाठवले होते. त्या अर्जात आपल्या पूर्वीच्या कृत्यांबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती आणि राजकारणात पुन्हा भाग घेणार नसल्याचे लिहिले होते असे प्रथमदर्शनी दिसते. पण हे सावरकरांचे डावपेच असावेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘भारतरत्न’ का देत नाही?
“अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतऱहेचे कायदेशीर प्रयत्न करीत असतो. १० वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत. स्वातंत्र्य लढय़ात दोघांचे योगदान तोलामोलाचे आहे. सावरकरांनी तर सर्व सुखांचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. सावरकरांचे वंशज एरवी कोठे दिसत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य केले की त्यांचा चेहरा वृत्तवाहिन्यांवर दिसतो. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
अशाने भारत कसा जोडणार?
“दोन महत्त्वाचे मुद्दे येथे देतो आणि विषय संपवतो. पत्रकार निखिल वागळे यांनी समाज माध्यमांवर एक सत्य सांगितले. ते म्हणतात, ‘‘संघाने आयुष्यभर हिंदू महासभा आणि सावरकरांचा राग राग केला. गोळवळकरांनी सावरकरांवर कठोर टीका केली आहे. आता राजकीय फायद्यासाठी भाजप आणि संघ त्यांना वापरताहेत.’’ हे परखड सत्य आज दिसतेच आहे. सावरकरांच्या राहुल गांधीकृत अपमानाबद्दल महाराष्ट्रात भाजप, मनसेसारखे लोक रस्त्यावर उतरले.
त्यांच्यासाठी पत्रकार शकील अक्तर यांनी एक प्रेमळ संदेश प्रसिद्ध केला आहे, ‘‘अगर बीजेपी सावरकर को सबसे बडा देशभक्त मानती तो सबसे ऊंची मूर्ती सरदार पटेल की नहीं, उनकी लगती. इंडिया गेट पर भी सुभाषचंद्र बोस की जगह सावरकर की मूर्ती लगती. मगर बीजेपी ने भी पटेल, सुभाषबाबू को ही महान देशभक्त माना.’’
वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावरकरप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे. पंतप्रधान मोदी नेहरूंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही. अशाने भारत कसा जोडणार?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.