मी मुख्यमंत्री झालो हेच काहींना अजूनही पचनी पडेना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका
मुंबई, १२ ऑगस्ट २०२४: राज्यात आगामी विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच सर्वच नेते, राज्याचा दौरा, मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका असं सर्व चित्र राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. मात्र, यातच राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “मी मुख्यमंत्री झाल्याचं विरोधकांना पचत नाही. त्यांना बसता, उठता आणि स्वप्नातही मीच दिसतो”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
“मुघलांच्याच्या घोड्यांना पाण्यात जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं विरोधकांना मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं हेच त्यांना पचत नाही. त्यांना अद्यापही हे पचत नाही की मी (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री झालो आहे. विरोधकांना बसता, उठता आणि स्वप्नातही मीच दिसतो. ते सांगत होते की सरकार आज पडेल, उद्या पडेल, पण सरकार दोन वर्षांपासून मजबुतीने उभा आहे. आम्हाला जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, मग ते आम्ही आणलेल्या योजनेचे अर्ज कसे भरतात? आम्ही आणलेल्या योजनांचे बॅनर कसे लावतात. हे सर्व दुटप्पी आहेत. विरोधकांना माझ्या बहिणींची आणि लाडक्या भावांशी काहीही देणेघेणं नाही. त्यांना फक्त घेणं माहिती आहे देणं माहिती नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप केला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे तर विरोधी पक्षात होते. गिरीश महाजन विरोधी पक्षात होते. एक वेळेस विरोधी पक्षांना अडचणीत आणणं हे आपण हे समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या सरकारमध्ये सहकारी होतो, तरीही अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे. मी याबाबतीत योग्य वेळी बोलेन”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, ते आले नाहीत. दुर्देवाने दोन समाजात जो काही संघर्ष सुरु आहे. हा थांबला पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. शरद पवार मला भेटले तेव्हाही मी त्यांना सांगितलं की, आपल्या राज्यात असं कधीही झालं नाही. निवडणुका येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात. मात्र, महाराष्ट्राला बाधा पोहोचता कामा नये”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.