तर आम्ही शांत बसणार नाही – नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

सातारा, १८ नोव्हेंबर २०२३: जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं होतं. याचे पडसाद राज्यभर उमटले असून छगन भुजबळांवर टीका होत आहे. आता भाजपा नेते, नरेंद्र पाटील यांनीही छगन भुजबळांना इशारा दिला आहे.भुजबळ पहिल्यापासून मराठा द्वेषी आहेत. आम्ही जरांगे-पाटलांच्या पाठिशी उभे आहोत. जरांगे-पाटलांना डिवचलं, तर आम्ही शांत बसणार नाही,” असं नरेंद्र पाटलांनी म्हटलं आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, “छगन भुजबळांनी विविध पदांवर काम केलं आहे. मराठा समाजाच्या सहकार्यानं काम करत असल्यानं भुजबळांनी सांगितलं आहे. पण, ‘ओबीसी एल्गार सभे’तून भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली आहे. भुजबळ पहिल्यापासून मराठाद्वेषी आहेत.”

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा आमदार जरांगे-पाटलांच्या पाठिशी उभे आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांना डिवचलं तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडा. आम्हाला त्याच्याशी देणं-घेणं नाही. जरांगे-पाटलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देणार.

दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर संभाजीराजे म्हणाले, “छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी.”