म्हणून माझा फोटो वापरला… शरद पवार यांची अजित पवारांवर टीका

मुंबई, ५ जुलै २०२३ : आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी आज भाषण करत असताना निवृत्तीच्या वयाची आठवण शरद पवार यांना करुन दिली. मात्र शांत आणि संयत भाषण करत शरद पवार यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार, तसंच त्यांच्यासह गेलेले आमदार यांच्यावर टीका केली.

पवार म्हणाले, “आज काही लोकांनी भाषणं केली. बोलताना सांगत होते शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं ही गंमतीची गोष्ट आहे असं मला वाटतं” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांनाही टोला

एक तर आपले सहकारी आहेत ते म्हणाले हे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मी काय चाललं आहे ते बघून येतो आणि तुम्हाला कळवतो असं मला सांगितलं. त्यानंतर मला त्यांनी शपथ घेतल्याचाच फोन केला. असं म्हणत शरद पवार यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे.

काही लोकांनी जायची भूमिका घेतली

महाराष्ट्रात काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी तक्रार नाही पण दुःख आहे. कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली होती. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणं योग्य नाही. एवढंच मला आज सांगायचं आहे. सध्या दिसतंय काय? नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काही गडबड झाली. ऑफिस कुणाचं तर राष्ट्रवादीचं. उद्या कुणीही उठलं आणि मी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे असं सांगितलं तर याला काही अर्थ आहे? ही गोष्ट लोकशाहीत योग्य आहे का? नाही पण ती झाली. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पक्षाची प्रॉपर्टी आहे ती काही लोक ताब्यात घेतात. पक्ष आमचा आहे, घड्याळ आमचं आहे असा दावा करतात. तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की खूण कुठेही जाणार नाही. चिन्ह कुठेही जाणा नाही आणि जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्या पक्षाचा विचार सामान्य माणसाच्या अंतःकरणात आपलं स्थान आहे तोपर्यंत काहीही चिंता करायचं कारण नाही हे मी तुम्हाला सांगतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपली आजची बैठक ऐतिहासिक आहे

आजची बैठक ही एक ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की २४ वर्षांपूर्वी तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली त्यानंतर शिवाजी पार्कवर लाखांची सभा झाली. पक्षाची स्थापना केल्यानंतर आज २४ वर्षे झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्याचं यश राष्ट्रवादीला आलं. कुणी आमदार आले, कुणी खासदार आले कुणी नगरसेवक झाले. सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताही राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं. आपण अनेक नवे नेते तयार केले. मनात एकच बाब होती ती म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या राज्यातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आज आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. संकटं खूप आहेत, ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशा लोकांकडे देशाची सूत्रं आहे. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या सहकाऱ्यांनाही बोलण्यास मर्यादा आहेत. मी मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात होतो, नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात होतो. या सगळ्यांची कामाची पद्धत पाहिली. एखादी भूमिका योग्य नसेल तर चर्चा व्हायची. संवाद व्हायचा, आज तो संवाद संपला आहे.

राज्यकर्त्यांचा संवाद संपला आहे

मी महाराष्ट्राचा चारवेळा मुख्यमंत्री झालो. निर्णय घेतल्यानंतर सामान्य माणसांना काय वाटतं आहे हे ऐकून घ्यावं लागतं. आज देशात संवाद तुटला आहे. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही. आम्ही लोकांमध्ये आहोत. त्यामुळेच कधीकाळी सामान्य माणसाची जी स्थिती समजते त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते पण राज्यकर्त्यांचा संवाद नसेल तर या गोष्टीतून मार्ग काढता येत नाही.

आज देशामध्ये कमालीची अस्वस्थता जनतेत आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवायची असेल तर संवाद सुरु करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. १७ आणि १८ तारखेलाही आम्ही एकत्र येत आहोत. हे जसं घडायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. देशाच्या पंतप्रधानांनी आठ दिवसांपूर्वी एक भाषण केलं. त्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खातं याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही गोष्टी पूर्ण हाती नसताना कमी माहितीवर करणं अपेक्षित नसतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते. त्यांनी सांगितलं देश कसा चालवायचा हे पवारांचं बोट धरुन मी शिकलो. निवडणुकीच्या काळात आले तेव्हा प्रचंड टीका केली. जे देशाचं नेतृत्व करतात त्यांनी बोलत असताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते. जे सत्य आहे तेच सांगितलं पाहिजे. पण तेवढी धमक पंतप्रधानांनी दाखवली नाही. आपण देशाचे नेता म्हणून जनमानसासमोर बोलतो त्यावेळी मर्यादा पाळली पाहिजे. त्या मर्यादा पाळल्या जात नाही असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

बरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत का घेतलं? याचा अर्थ असा आहे की हे सत्ताधारी वाट्टेल ते बोलतात आणि जनमानसात एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असंही शरद पवार यांनी म्हटलंं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप