पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? नाशिक पदवीधर निवडणुकीतील भाजपच्या खेळीवर वळसे पाटील यांची टीका
मुंबई, १३ जानेवारी २०२३: नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसला धोबीपछाड दिला. यावरून महाविकास आघाडीमध्येही गोंधळ उडाला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शांत, संयमी व मोजके बोलणारे अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील या नेत्यांने या वादात वाढ उडी मारली असून “पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?”असा सवाल करत भाजपवर टीका केली.
भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. आज सकाळीच हे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.