शिवसेना वंचितची युती सोईसाठी – आपची टीका
पुणे, २४ जानेवारी २०२३: राज्यामध्ये कधी कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत आघाडी युती करेल याची शाश्वती नसताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याने यावर आम आदमी पक्षाने टीका केली आहे. ही युती म्हणजे सोयीस्कर राजकारणासाठी केलेली तडजोड असून, राज्यांमध्ये केवळ आम आदमी पार्टी हा एकमेव पक्षात विश्वास पात्र आहे असे आमचे राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष नेहमीच मोठ्या विचारधारेशी आणि आदर्श व्यक्तींची आपली नाळ जोडलेली असल्याचे सांगत मतदारांपुढे वेळोवेळी केलेल्या आघाड्यांचे समर्थन करीत असतात. याच आघाड्यांमधला ‘एक नव्या राजकीय सोयीचा युतीप्रयोग’ म्हणूनच आंबेडकरांनी वंचित आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती पाहायला लागेल.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात मतदाराने दिलेल्या कौलापेक्षा वेगळ्याच आघाड्या वेळोवेळी तयार झाल्या आणि मोडल्या. मागील निवडणूकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित दादा आणि भाजपचे फडणवीस यांचा शपथविधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची आघाडी, त्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांची आघाडी तर दुसरीकडे मनसेच्या इकडून तिकडे उड्या हे महाराष्ट्राने पाहिले. त्यातच आता मुंबईची महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांचे वंचित आघाडी यांनी युतीची घोषणा केली आहे. या सगळ्यांमध्ये ‘आजोबां’ची विचारधारा ही गौण बाब असून तक्तालीन राजकीय सोय हीच महत्त्वाची आहे असे दिसते.
गेल्या काही महिन्यांमध्ये एकमेकांवरती आरोप करणे, महनीय व्यक्तींविषयी विवादास्पद विधाने करणे एवढेच काम सत्ताधारी आणि विधानसभेतील विरोधी पक्ष यांनी केले आहे. प्रस्थापित विरोधी पक्षाने सुद्धा जनतेचे कुठलेही प्रश्न न उचलता धर्म रक्षक की स्वराज्य रक्षक, तर कधी ऊर्फी, लव जिहाद अशा भावनात्मक प्रश्नांचाच धुराळा उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेच्या प्रश्नांवर आवाज न उठवता विवादस्पद विधाने म्हणजे या संधीसाधू पक्षांची भविष्यकाळात कुठल्याही प्रकारची युती होऊ शकते याची पूर्वतयारी आहे. लवकरच प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे सुद्धा एकत्र दिसतीलच. त्यामुळे जनतेसमोर विश्वासार्हता गमावलेल्या राजकीय पक्षांना आम आदमी पार्टी हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय येणाऱ्या महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत असेल. वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवणारी आणि मोदींच्या दमनकारी राजकारणाला दिल्ली, गुजरात सह सर्वत्र आव्हान देणारी आम आदमी पार्टी हीच जनतेची आशा आहे, असे
आपचे राज्य प्रवक्ते, मुकुंद किर्दत यांनी सांगितले.