मुला मुलीला वारसा देण्याच्या महत्वकांक्षेमुळे शिवसेना राष्ट्रवादी फुटली: देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई, २८ सप्टेंबर २०२४: राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झालं. त्यानंतरच्या दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. या पक्षातील दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले. राज्यात आता तीन पक्षांंचं महायुतीचं सरकार आहे. परंतु, अजूनही या फाटाफुटीची चर्चा सुरूच असते. दोन्ही पक्ष भाजपनेच फोडले असा आरोप विरोधी पक्षांकडून आजही केला जातो. आता या आरोपांना आणि दोन्ही पक्ष फुटण्याला नेमकं कोण जबाबदार आहे या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनीच दिलं आहे. भाजपमुळे राज्यात सहा पक्ष तयार झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक काळ असा होता की त्यावेळी काँग्रेसचे लोक म्हणायचे की या सगळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता. अजूनही काही प्रमाणात असं बोललं जात आहेच. पण खरं तस नाही. खरं म्हणजे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. आपल्या मुलीला आणि मुलाला पक्षाचा वारसा द्यायचा या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला असे फडणवीस यांनी न्यूज १८ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष भाजप कसा काय फोडू शकतो? असा प्रतिसवाल फडणवीस यांनी केला. खरं तर शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. इतकी वर्ष त्यांनी त्यांचा वारसा अजित पवारांकडं दिला होता. नंतर त्यांना वाटलं की आता हा वारसा मुलीला दिला पाहिजे. राजकारणातील घराणेशाहीच्या पक्षांची अवस्था अशीच होत असते. यानंतर अजित पवार यांना वाटलं की आता आपलं राजकारणच संपेल त्यावेळी ते आमच्यासोबत आले असे फडणवीस म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेना देण्याचा प्रयत्न शिवसेनेतील बंडखोरीवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंनाही या गोष्टीची जाणीव झाली होती की आता ज्या काही तडजोडी चालल्या आहेत त्या आदित्य ठाकरेंसाठी चालल्या आहेत. एकनाथ शिंदेंचं पक्षातलं महत्व वाढत चाललं होतं. त्यांचं महत्व कमी करून पक्ष आदित्य ठाकरेंच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न झाले त्यामुळेच शिवसेना फुटली असे थेट वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.