शिंदे – फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे – सामनातून सरकारवर टीका

मुंबई, ६ ऑगस्ट २०२२: अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने आणि नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत.मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे – फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, अशी खोचक टीका सामाना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरकारवर करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या सामना या वृत्तपत्रातून नेहमीच राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. वृत्तपत्रात नुकत्याच लीहण्यात आलेल्या अग्रलेखात शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली असून, कायद्यानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच लवकरच ठाकरे स्वत: उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी दौरा करणार असल्याची यामध्ये सूचित करण्यात आले आहे.

अग्रलेखानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून राज्याची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली, ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचं वृत्त अलिबाबा आणि चाळिस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचं शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २०-२२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही, तरीही मुख्यमंत्री आजारी पडावेत, हे त्या चाळीस जणांसाठी चिंताजनक आहे. आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो, अशी शिंदे गटाची अवस्था झाल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल, राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतर उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य आणि इमानदारीचाच विजय होईल, असेही अग्रलेखात लिहले आहे.