शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्राला सुडाचा राजकारण दिले: जयंत पाटील यांची टीका

नागपूर, १६ एप्रिल २०२३ : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. या सरकारने महाराष्ट्राला केवळ सुडाचं राजकारण दिलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.

 

नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आमची वज्रमूठ ही विदर्भातल्या शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्य सरकारला विचारते आहे, तुम्ही गेल्या वर्षभरात नेमके काय दिवे लावले. खरं तर शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाठी कोणताही महत्त्वाचे निर्णय घेतले नाहीत. या सरकारने महाराष्ट्राला केवळ सुडाचं राजकारण दिलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

आज जे लोक भाजपा विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात सुडाचं राजकारण केलं जात आहे. अशा लोकांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. जे लोक विरोधात बोलतात, त्यांच्या विरोधात तपासयंत्रणांचा ससेमिरा लावला जातो, असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींना दिलेल्या स्थगितीवरून त्यांनी टीकास्र सोडलं. शिंदे सरकारने सत्ते आल्याआल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील विविद तरतुदींना स्थगिती दिली. अजित पवार यांनी एक समतोल अर्थसंकल्प मांडला होता. पण त्यांनी कामांना स्थगिती देण्यांचं पाप या सरकारने केलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.