अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच – शरद पवारांचे वक्तव्य
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३: भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे. तर अजित पवार हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी एक टोलाही लगावला आहे. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असून, ही न घडणारी गोष्ट आहे, असे वक्तव्य करत अजित पवार यांच्या दुसऱ्या नसेवर पवार यांनी बोट ठेवले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविण्याची अजित पवार यांची तीव्र इच्छा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची यापूर्वी युती असताना राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून येऊन देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर याबाबत अजित पवार यांनी शरद पवार हे मला मुख्यमंत्री होऊ देत नाहीत असे थेट वक्तव्य तोफ डागली होती आता अजित पवार भाजप सोबत आल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील अशी अटकळ गेल्या काही महिन्यांपासून लावली जात असताना आता मात्र पवार यांनी अजित पवार यांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवले आहे.
अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज शरद पवार बोलत होते.
अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचं की नाही हे लोकच ठरवतील, असेही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल अजितदादांनी लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ते म्हणाले की, यूएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी हरकत नाही असा टोलादेखील पवारांनी लगावला आहे.
यावेळी छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवरदेखील पवारांनी पलटवार करत भुजबळांनी खोट बोलल्याचे मान्य केले. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नसल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. त्यापुढची जी पायरी होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती असे म्हणत आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे पवार म्हणाले.
भाजपविरोधात बंड पुकारत देशभरातील प्रमुखपक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. यात पुढील काळात कोणा कोणाचा समावेश होणार असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षाची आघाडी आहे. यात काही आणखी शेतकरी कामगारपक्षासारखे पक्षही येतील असे यावेळी पवारांनी स्पष्ट केले.