अजित पवार यांना टक्कर शरद पवार ही पुण्यात करणार रोड शो
पुणे, १६ सप्टेंबर २०२३: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शरद पवारांनी बंडाळी करणाऱ्या नेत्यांच्या संघात सभा घ्यायला सुरूवात केली. शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार गटातील नेत्यांना लक्ष्य केलं जातं. दरम्यान, आता खुद्द शरद पवार हे पुण्यात रोड शो करणार आहेत. ते २७ ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. याच दिवशी ते पुण्यात रोड शो करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी २ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. याला आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही गटांकडून सभा-उत्तरसभा घेतल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पुण्यात आणि बारामतीत रोड शो करून शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटही पुण्यात रोड शो करत आहे. २७ ऑक्टोबरला हा रोड शो होणार असल्याची माहिती आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप