लोकसभेच्या जागावाटपावर समंजस्याने मार्ग काढू – शरद पवार

पुणे, १९ मे २०२३: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारत घेत महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जात आहे. यानंतर आता तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठं विधान केलं. आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. तो आमचा आकडा कायम राहील, असं विधान संजय राऊतांनी केल होत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊतांना त्यांची भूमीका मांडण्याचा अधिकार आहे, पण समंजस्याने मार्ग काढू.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय समीकरणं आखली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या जागा आमच्याच राहणार. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी ती एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असं म्हणतोय मी. ही आमची मागणी नाही.”

राऊतांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला अजून अवकाश आहे. संजय राऊतांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला असा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसू आणि यावर सामंजस्याने मार्ग काढू” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप