शरद पवार म्हणाले – “अजित पवारांना पुन्हा संधी नाही”

सातारा, २५/०८/२०२३: पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरल होत. पण अजित पवार पुन्हा एकदा तसेच वागले आहेत. त्यामुळे संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.

गुरुवारी सुप्रिया सुळेंनी पुण्यात बोलताना अजित पवार आमचे नेते असून पक्षात फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात बारामतीमध्ये शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना पक्षात फूट पडली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

शरद पवारांनीही अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं मान्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. २०१९प्रमाणे अजित पवार पुन्हा माघारी येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात साताऱ्याच्या दहिवाडीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा विचारणा केली असता त्यांनी हे विधान फेटाळतानाच अजित पवारांना पुन्हा संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

“एकदा-दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती सरळ केली असेल तर सुधारणा करण्याची एक संधी द्यावी अशी भूमिका पक्षानं यापूर्वी घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले. “तुम्हाला आठवत असेल, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही, आमच्याकडून चुकीची गोष्ट घडली, पुन्हा अशा रस्त्याने जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी म्हणून वेगळा निर्णय घेतला होता”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

 पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे. “संधी वारंवार मागायची नसते, आणि मागितली तरी ती द्यायची नसते. आमची भूमिका स्पष्ट आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप