शरद पवार भुजबळांच्या विरोधात टाकला डाव
येवला, २ ऑक्टोबर २०२४ः केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शरद पवार येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मोठा डाव टाकण्याची तयारी करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला असताना शरद पवार यांच्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शरद पवार तगडा उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ( २ ऑक्टोबर) कुणाल दराडे यांनी भेट घेऊन येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघात कुणाल दराडे यांना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
कुणाल दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव आहे. कुणाल दराडे यांनी आज जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आणि दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळाली आहे. कुणाल दराडे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा देखील काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात सुरु आहे त्यामुळे जयंत पाटील आणि कुणाल दराडे यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात येवला विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळांविरुद्ध शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी करण्यात येत आहे.