शरद पवार यांनी मौन सोडले, म्हणाले “राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या”;
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२२ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर पाच दिवसांनी यावर भाष्य करत मौनव्रत सोडले. राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी मर्यादांचं उल्लंघन केल आहे. आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा, असे मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी हे दिल्ली दौर्यावर आहेत. असं असतानाच शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्याचं पण दुसऱ्या दिवशी राज्यापालांनी छत्रपतींचे गुणगान गायल्याचा प्रकार म्हणजे उशीरा आलेले शहाणपण असल्याचा टोला लगावला.
“राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्यानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल चांगल बोलल्याचं स्टेटमेंट आलं. हे मात्र सगळ्या प्रतिक्रियांनंतर उशीराचं शहाणपण आहे. राज्यपालांचा विषय आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी बघावा असं सूचक विधान पवारांनी केलं.
नेमकं प्रकरण काय?
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील सोहळ्यात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केली होती. यावेळी शरद पवार ही उपस्थित होते हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर झाला, मराठवाडा विद्यापीठातर्फे मानद डि.लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला