निर्लज्ज शब्द भोवला, जयंत पाटील यांचे निलंबन
नागपूर, २२ डिसेंबर २०२२ : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटील यांचं या अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलं आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी अध्यक्ष महोदय असा निर्लज्जपणा करू नका, असं विधान केलं.
जयंत पाटलांच्या या विधानानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. तसंच जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटील यांचं वक्तव्य तपासण्यात आलं आणि मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी माफी मागितली. तसंच असं वक्तव्य कुणीही करू नये, असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या अधिवेशनात अजित पवार यांना दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.