विखे पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य – “मतदारांना ‘पाकीट’ वाटावेच लागते”
वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर), ता. २०/०५/२०२३: “हात जोडून रडल्याने सहानभूती मिळते, मतदान मिळत नाही. निवडणुकीत मतदारांना ‘पाकीट’ वाटप करावेच लागते. तेव्हा निवडणूक जिंकली जाते,” असे खळबळजनक वक्तव्यमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केले.
वैजापूर येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यअर्थमंत्री डॉ. भागवत कराड, माजी सभापती हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरणारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे आदी उपस्थित होते.
“माझे कुटुंब-तुमची जबाबदारी अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबूक लाइव्हद्वारे मुख्यमंत्रिपद उपभोगून महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न कसे समजणार”, अशी टीका विखे यांनी केली. ते म्हणाले, की पाणंद रस्त्यांची कामे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी अडचणयेत आहे. यापुढील काळात सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करून त्यांना क्रमांक देण्यात येईल; जेणेकरून या रस्त्यांचे कायमस्वरूपी अस्तित्व राहील. त्यासाठी साठ ते सत्तर हजार कोटी रुपयांचा आराखडा विचाराधीन आहे.
वाळू माफियांना वठणीवर आणू
“वाळू तस्करीला लगाम घातला जाईल. परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने वाळू डेपोच्या माध्यमातून सहाशे रुपये प्रतिब्रास या दराने वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करताना वाळूतस्कर व त्यांना साथ देणारे प्रशासनातीलच काही अधिकारी आडकाठी करून डेपो बंद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. मात्र, सरकार कोणत्याही परिस्थितीत त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. ‘मोका’सारखे कायदे लावून त्यांना वठणीवर आणू”, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप