चिंचवड मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

पुणे, 14 फेब्रुवारी 2023: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले,उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर ९ फेब्रुवारी रोजी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय सरमिसळनंतर (रँडमायझेशन) चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ६३८ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट आणि ६६३ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत.

चिंचवड विधानसभा संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील अतिरिक्त बॅलेट युनिट पोटनिवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात या बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी करण्यात आली. ही तपासणी काल (१३ फेब्रुवारी) पूर्ण झाली. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ७९० बॅलेट युनिट, ७६ कंट्रोल युनिट आणि १०२ व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले.

याप्रमाणे चिंचवड मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या एकूण १ हजार ४२८ बॅलेट युनिट, ७१४ कंट्रोल युनिट आणि ७६५ व्हीव्हीपॅटची द्वितीय सरमिसळ उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणुक मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व यंत्रे तयार (कमिशनिंग) करण्याची प्रक्रीया केली जाईल. या सर्व प्रक्रियेची पूर्वसूचना उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात येत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी कळवले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप