कोल्हापुरच्या पाणी योजनेवरून सतेज पाटील आणि मुश्रीफांमध्ये जुंपली

कोल्हापूर, २१ ऑक्टोबर २०२३: गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या थेट पाइपलाइनचा मुद्दा कोल्हापुरात चांगलाच गाजत आहे. पंधरा दिवसांत थेट पाइपलाइनचे पाणी घराघरांत पोहोचणार आहे. तत्पूर्वी त्याच्या श्रेयवादावरून दोन मित्रांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी या योजनेला मंजुरी आणल्यापासून ते आतापर्यंत काम मार्गी लागण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट पाइपलाइनचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच दिल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

मी पालकमंत्री होणे आणि थेट पाइपलाइन कार्यान्वित होणे हे अंबाबाईचे देणे आहे. आघाडीच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री पहिल्यांदा झाले. त्यावेळी सासने ग्राउंड येथे त्यांचा सत्कार सभारंभ पार पडला होता. त्यावेळी मी थेट पाइपलाइनचा प्रश्न अजित पवार यांच्याकडे ठाम लावून धरला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी थेट पाइपलाइनचा प्रश्न मी मार्गी लावणार, त्यासाठी कितीही निधी लागला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटल्याचा दाखला मुश्रीफ यांनी दिला

“तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४५० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे काम असल्याने ही मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवली. त्यावेळी शहरी आणि विकासमंत्री कमलनाथ यांनी त्यावर सही केली. देशातली पहिली योजना अशी होती की काम सुरू होण्याआधी पैसे महापालिकेच्या तिजोरीत आले होते. ठेकेदारामुळे झालेल्या विलंब, त्यामुळे सहा वेळा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी आम्ही दिल्ली वारीदेखील केल्या. पण बोलून न थांबता आम्ही हे काम मार्गी लावतोय यात मला आनंद आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.

श्रेय घेणार नाही : धनंजय महाडिक

गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या काळमवाडी थेट पाइपलाइनवरून माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सातत्याने विरोधकांकडून आरोप होत होते. चार वर्षांपूर्वी मुश्रीफ यांनी दिवाळीला अभ्यंग स्नान घातले जाईल असं सांगितले होते. पण प्रत्यक्षात त्याला २०२३ वर्ष उजाडावे लागले. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना विचारले असता, त्यांनी थेट पाइपलाइनचे श्रेय आम्ही घेणार नाही. त्यांच्या कामाचे श्रेय त्यांनाच मिळाले पाहिजे, त्यांचा त्यांना लखलाभ, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली होती.