सांताक्लॉज देणार एमटीडीसी’च्या पर्यटकांना जबाबदार पर्यटनाचा संदेश
पुणे, दि. २० डिसेबर २०२२: गुलाबी थंडीची चाहुल, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून पर्यटकांना भटकंतीचे वेध लागले आहे. डिसेंबर महिन्यात असलेला पर्यटनाचा हंगाम लक्षात घेत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देखील आपल्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यंदा विशेष म्हणजे, पर्यटकांसाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच सर्वांचा आवडता सांताक्लॉज खास एमटीडीसी’च्या पर्यटकांना जबाबदार पर्यटनाचा संदेश देणार आहे.
याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे म्हणाले, “महामंडळ नववर्षानिमित्त पर्यटकांसाठी अनुभवात्मक पर्यटन उपक्रम राबविणार आहे. स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. योगा आणि वेलनेस ची शिबिरे घेण्याचा मानस असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपारीक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. पर्यटक निवासाच्या 100 किमी च्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहीती पर्यटक निवासांमध्ये पर्यटकांना देण्यात येणार आहे.”
तसेच पर्यटक निवासांमध्ये “सांताक्लॉज’” चॉकलेट बरोबरच निसर्गाचे भान ठेवुन जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी विंनती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महामंडळातर्फे राज्यात एकूण 30 पर्यटक निवासे व उपहारगृह यांचे परिचलन होत आहे.निसर्ग पर्यटन, वर्क फ्रॉम नेचर, योगा अँड वेलनेस असे विविध उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. यंदा पर्यटनासाठी औरंगाबाद विभागातील अजंठा (फर्दापुर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. अशी माहिती हरणे यांनी दिली.