“राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’…” शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

दिल्ली, १५ मार्च २०२३ : अलीकडच्या काही दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवरून बराच गदारोळ सुरू आहे. याप्रकरणी शिवसेनेतील ( ठाकरे गट ) कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. हा तुमच्या गटातील अंतर्गत वाद आहे, त्यात शिवसेनेला लक्ष्य करू नका, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे. दादा कोंडके हवे होते. त्यांचा ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा खूप गाजला होता. पण, ‘मुका घ्या मुका’ प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? त्यांचा संबंध काय? हा सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे.”

“शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सुटणार नाही, अशी कलम दाखल करण्यात येत आहेत. आम्ही सांगितलं होतं का मुका घ्यायला. मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊद्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“मला असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत. आमच्या घरी आणि कार्यालयात पोलीस आलेत. हा काय प्रकार चालू आहे. मुळात तो व्हिडीओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक केली का? मग कोणाची बदनामी करत आहात. ही तुमच्या गटातील अंतर्गत भांडणं असतील, तर ती तुम्ही मिटवा, शिवसेनेला लक्ष्य करू नका,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“याप्रकरणात प्रकाश सुर्वेंनी समोर आलं पाहिजे. मुका घेणारे पहिले गुन्हेगार ते आहेत. दादा कोंडकेंनी त्यावर सिनेमाच काढला असता. आता शिंदे गट नव्याने सिनेमा सुरू करणार असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असाल, तर पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे,” अशी मागणी संजय राऊतांनी केली.

“…नाहीतर शायिस्तेखानाची बोटं तुटलीच समजा”

“तुम्ही आमच्या लोकांना लोकांना धमक्या देता, अटक करता. रात्रीचं शिवसैनिकांचे दरवाजे ठोठावत त्यांच्या बायका आणि पालकांना धमक्या देत आहात. तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तारा. आमच्यावर बोट दाखवू नका. नाहीतर शायिस्तेखानाची बोटं तुटलीच समजा,” असा इशारा संजय राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप