संजय राऊत यांचा लोकसभेच्या 19 जागांवर दावा, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
मुंबई, १९ मे २०२३ : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष प्रत्येकी १६ जागा लढवतील असा पर्याय पुढे आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे. शिवसेनेचे आता १९ खासदार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. आम्ही काय बाजारामध्ये उभे नाहीत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी राज्यात विधानसभा आणि देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या एकत्र होतील की स्वतंत्र यावरही संभ्रम निर्माण झालेला असताना महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ जागांचं वाटप मविआतील मित्रपक्षांमध्ये कशा प्रकारे असेल? याची चर्चा सुरू असताना यासंदर्भात फॉर्म्युला ठरल्याचे अंदाज लावले जात आहेत. याबाबत संजय राऊतांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर माहिती दिली आहे. राऊत म्हणाले, “आमची पहिली बैठक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरेही होते. पण १६-१६ चा फॉर्म्युला ठरला ही बातमी मला तुम्ही देताय. आम्हाला माहिती नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबत बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या तर राहणारच. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असं म्हणतोय मी. ही आमची मागणी नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप