शिंदेंना हटवणार पवारांना मुख्यमंत्री करणार – संजय राऊत यांचा दावा
मुंबई, ३ जुलै २०२३ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर त्याचे पडसात राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असले तरी शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवार यांनाच भाजप मुख्यमंत्री करेल असा दावा ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज केला.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना पाठिंबा देताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
राज्यात जे घडतंय, तो लोकशाहीशी खेळ असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. “तुम्ही फडणवीसांचं भाषण पाहा. अजित पवार जेलमध्ये ‘चक्की पिसिंग, छगन भुजबळ ‘चक्की पिसिंग’ म्हणत होते. आता हे कोण करणार? हा देशाच्या लोकशाहीशी खेळ चालला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर आहे, आमच्यासोबत राहील”, असा दावाही त्यांनी केला
दरम्यान, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “महाराष्ट्रात ही परंपरा कधीच नव्हती.आज मी ऑन कॅमेरा सांगतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलतोय. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. एकनाथ शिंदेंना हटवलं जाणार आहे. अपात्रतेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार आहेत. म्हणून अजित पवारांना घाईगडबडीत सोबत घेतलंय. अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
देशाच्या राजकारणाला मोदी-शाहांचं हे देणं आहे. आयाराम-गयारामचं हे नवीन राजकारण आहे. पण जनता अद्दल घडवेल. सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय. अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले होते. हे सगळं ईडीचं राजकारण आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स दोन तासांसाठी आमच्या हातात द्या. आम्हीही महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बदलून टाकू”, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप