संजय गायकवाडांना शिंदे-फडणवीसांसमोर अजितदादांनी झाप-झाप झापलं
बुलढाणा, १९ सप्टेंबर २०२४ : गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे. अशाच वादग्रस्त विधानं करून महायुतीतील नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यासह विरोधकांना अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच फैलावर घेतलं. या सर्वांचे कान टोचतांना अजितदादांचा रूद्रावतार पाहण्यास मिळाला. ते बुलढाण्यात आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देणार असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. या विधानानंतर वातावरण तापलेले असतानाच भाजप खासदा अनिल बोंडेंनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्यापेक्षा त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजे असे म्हणत वाद वाढवला. या दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर महायुतीतील नेत्यांची मात्र पुरती कोंडी झाल्याचे पाहण्या मिळाले. अखेर याबाबत अजितदादांनी एकनाथ शिंदेंसमोरच संजय गायकवाडांचे नाव न घेता भर मंचावर कान टोचले.
अजित पवार म्हणाले, “मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, विचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाडाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते?”, असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.