रोहित पवारांची इडीच्या कार्यालयात चौकशी, शरद पवार करणार शक्तीप्रदर्शन

मुंबई, २३ जानेवारी २०२४ : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या (२४ जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यावर आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नातवासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार यांना चौकशीला सोडायला खासदार सुप्रिया सुळे आणि हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. तर चौकशीवेळी स्वतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे कार्यालय ईडी कार्यालयाच्या जवळ असल्याने आमदार पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार पक्ष कार्यालयात बसून राहणार असल्याची माहिती आहे. यातून पक्ष तर रोहित पवारांच्या पाठीशी आहेच पण आजोबा म्हणून आपण नातवाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असा मेसेज देण्याचा पवार यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. याशिवाय पुणे, बारामती आदी ६ ठिकाणीही ईडीने छापेमारी केली होती. यासोबतच आयकर विभागाने देखील रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्यावरही छापा टाकला होता. त्यानंतर गत आठवड्यात त्यांना ईडीकडून समन्स काढत २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार, ते उद्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट रद्द करण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. बारामती अ‍ॅग्रो कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले आदेशच उच्च न्यायालयाने रद्द केले होते. मात्र तेव्हापासून रोहित पवारची बारामती अ‍ॅग्रो कंपनी चर्चेत होती.