मुंबईतील रात्री ८ के १० या दोन तासातच फटाके फोडता येणार निर्बंध झाले अधिक कडक – बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांचे आवाहन

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मुंबईतील हवा प्रदूषण धोकादायक पातळीवर आलेले असताना उच्च न्यायालयाने हे प्रदूषण रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले आहेत पूर्वी हे निर्बंध रात्री सात ते दहा या वेळेत असे होते पण वाढते प्रदूषण बघता आता फटके वाजवण्याची वेळ एका तासाने कमी करून रात्री आठ ते दहा या वेळेतच नागरिकांना फटाके फोडता येणार आहेत बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी यासंदर्भात आवाहन केले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने चहा यांनी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यामध्ये त्यांनी फटाके फोडण्या संदर्भात आवाहन केले आहे.

चहल म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वांना प्रिय असा दीपावली सण सुरू झाला आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सव आपल्याला चांगले आणि योग्य वागण्याची शिकवण देतो. यंदाचा दीपोत्सव सुरू झाला आहे. यंदाच्या दीपावलीमध्ये मुंबईकरांकडून विशेष असे सहकार्य अपेक्षित आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, यंदाच्या दीपोत्सवात रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत. कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावेत.

वातावरणातीव बदलामुळे तसेच बांधकामांमधून उडणारी धूळ आणि इतर कारणांनी वायू प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कार्यवाहीला फक्त शासकीय कामकाजापुरते मर्यादित न ठेवता त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. कारण लोकचळवळीतून केलेले कामकाज नक्कीच यशस्वी होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत.

विशेषतः प्रदूषण वाढीतील मोठा घटक ठरत असलेली धूळ पसरु नये म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम देखील दिसत आहे. असे असले तरी, एकट्या महाराष्ट्र शासनाने किंवा महानगरपालिकेने प्रयत्न करून चालणार नाही. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्व नागरिकांचे सहकार्य आणि सहभागाची जोड मिळाली तर प्रदूषण निश्चितच रोखता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दीपावली सणामध्ये नागरिकांनी रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात महापालिकेने दिवाळीत फटाके फोडू नये असे आवाहान केले होते. त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. अशाच प्रकारचे सहकार्य यंदा दिवाळी सणामध्ये करावे, असे चहल यांनी नमूद केले आहे.