“राजीनामा हा राष्ट्रवादीचा चित्रपट” – देवेंद्र फडणवीस यांनी उडवली खिल्ली

मुंबई, ५ मे २०२३ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने आज फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट असल्याचे सांगत या निर्णयाची खिल्ली उडवली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘हा सगळा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहेत. त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा सिनेमा संपत नाही तो पर्यंत आम्ही त्यावर काय प्रतिक्रिया देणार? या पटकथेचा ज्यावेळी शेवट समजेल त्यावेळी यावर प्रतिक्रिया देऊ’, असे फडणवीस म्हणाले.
त्यानंतर राज्याच्या राजकारणात या ज्या काही घडामोडी घडल्या. त्या स्क्रिप्टेड वाटतात का ? या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिसवाल केला ते म्हणाले, ‘मी कुठं असं म्हटलंय ?’ कर्नाटकात (Karnataka Elections) भाजप हद्दपार होईल असा दावा काँग्रेसने केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘काँग्रेसचा हा विचार म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत’, असा टोला त्यांनी कांँग्रेस नेत्यांना लगावला.
उद्धव ठाकरेंचा विकासविरोधी चेहरा
‘उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा आता बाहेर आला आहे. त्यांना बारसू येथील जनतेशी काही देणेघेणे नाही. विकासाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे त्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. आता त्यांना बारसूतील लोकांचा खांदा मिळाला आहे.’

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप