“नैतिकता असेल तर राजीनामा द्या” – उद्धव ठाकरे यांचे शिंदेंना आव्हान
मुंबई, ११ मे २०२३ : मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यांनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता शिल्लक असेल, तर मी दिला तसाच त्यांनीही राजीनामा द्यायला हवा, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, देशामध्ये एकूणच लोकशाहीची हत्या होते की काय असे दिसते आहे. आजच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे. हा निर्णय जो दिला आहे त्यामरध्ये राज्यापालांची भूमिका सरळरसरळ चुकीची होती, असे म्हटले आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती. पण आता ही यंत्रणा ठेवावी की नाही याबाबत कोर्टात जावे लागेल, असे ठाकरे म्हणाले आहेत. अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा माझी शिवसेना म्हणजे त्यावेळची शिवसेना यांचाच राहील असे म्हटल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
यावेळी कोर्टाने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचे सरकार परत आणले असते असे म्हटले आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे. राजीनामा देणं कायदेशीररित्या चुकलं असेलही पण ज्यांना शिवसेनेने सर्व काही दिलं त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नव्हतं, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच माझ्याच शिवसेनेचा व्हीप लागू होणार. फुटीरांचा व्हीप कोर्टाकडून अमान्य झाला आहे. माझ्याप्रमाने शिंदे- फडणवीसांनीही राजीनामा द्यावा, असे ठाकरे म्हणाले आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप