जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा, नाना पटोले आक्रमक

मुंबई, २ जानेवारी २०२३ ः केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे. या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे.

आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर एक ते दोन वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे.

हा काळा कायदा मंजूर करुन घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपालाही आपला पाठिंबा असल्याचे यावेळी कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघाता झाल्यास जबाबदार ट्रकचालकाला दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. त्याचबरोबर ट्रकचालकाला सात लाख रुपये दंड देखील भरावा लागणार आहे. या कायद्याला देशभरातून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे.
हा नवीन कायदा रद्द करण्याची मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. त्यात आजपासून अर्थात १ ते ३ जानेवारीदरम्यान टँकरचालक संपावर जाणार आहेत.