प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचं पठन? जितेंद्र आव्हाडांचा गंभीर दावा
ठाणे, २७ जानेवारी २०२३ : भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. १७ राज्ये आणि १० केंद्रीय मंत्रालयांचे मिळून २७ चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. अनेक राज्यांनी नारीशक्तीचा बहुमान करणारी चित्ररथे सादर केली होती. मात्र या कार्यक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचे पठन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात मनुस्मृतीच्या श्लोकाचे पठन होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कृतीमुळे मनुला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दोन ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात, “आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी मनुस्मृतीच्या श्लोकांचे पठन करण्यात आले. काही ठिकाणी कार्यक्रमांची सुरुवातच , “जिथे स्त्रिया पूजतात, तिथे देव रमतात”, या भगवान मनुच्या श्लोकाने झाली. न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे यातना झाल्या असतील की, ज्यांच्या जीवनाचा उद्देश समतेसाठी मनुस्मृतीचे दहन करणे हाच होता. आज त्याच मनुला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळत आहे.”
आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी मनुस्मृतीच्या श्लोकांचे पठण करण्यात आले. काही ठिकाणी कार्यक्रमांची सुरुवातच , “जिथे स्त्रिया पूजतात, तिथे देव रमतात”, या भगवान मनुच्या श्लोकाने झाली.
मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेण्याची जितेंद्र आव्हाड यांची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ९ जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत मनुस्मृतीवर टीका केली होती. ते म्हणाले होते, “ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते … घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये.”
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न झाला.