फडणवीस साहेब पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवाच – रवींद्र धंगेकर यांची मागणी
पुणे, २१ मे २०२४: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात आले असून पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. त्यांचे मी पुणेकरांच्या वतीने पुण्यात स्वागत करतो. पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे. याबाबत निर्णय जाहीर करून आपण पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी फडणवीस यांच्याकडे केली.
कल्याणीनगर मधील अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात आले आहे. यानिमित्ताने रवींद्र धंगेकर यांनी विविध मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. वेगवेगळ्या भागातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. अशा पुण्यात पब संस्कृतीचे पेव वाढत आहे वडगाव शेरी, खराडी, कोरेगाव पार्क यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे पब संस्कृती वाढत आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत हे पब सुरू राहत आहेत. या भागातील नागरिकांनी अनेकदा यापूर्वी कारवाई व्हावी, अशी मागणी केली. विनंती केली. पण हे बेकायदेशीरपणे थाटामाटात सुरू आहेत यांच्यामुळे अल्पवयीन मुलांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे शहरातील पब संस्कृती संपली पाहिजे, अशी मागणी मी पुणेकरांच्या वतीने गृहमंत्र्यांकडे केली.
कल्याणी नगर येथे अपघात घडल्यानंतर या प्रकरणातील दोषी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणा मोठ्या वेगाने कामाला लागली. पोलिसांनी जी कलमे लावणे आवश्यक होती ती लावली नाहीत. उलट आरोपीला लवकर सोडवता यावे यासाठी रेड कार्पेट अंथरले गेले. त्यामुळे संशयाची सुई तपास अधिकाऱ्याकडे जाते. या प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झालेला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच तपास अधिकाऱ्यावर कारवाईही झाली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांच्या व्यावसायिक कामात देखील अनियमितता आहे. नियमावलीला फाटा देऊन त्यांनी कामे केली आहेत. याची गृहखात्याने चौकशी करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली