राऊतांना वक्तव्य भोवले; नाशिक मध्ये गुन्हा दाखल
मुंबई, १५ मे २०२३ :हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका”, असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले होते मात्र आता हे वक्तव्य त्यांच्या अंगलट आलेले आहेत. याप्रकरणी नाशिक मध्ये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावरून राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत याचा माझ्यावर काही फरक पडणार नाही असे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या बेकायदेशीर सरकारचे आदेश पाहू नका आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम ५०५ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी आता महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी आज ट्वीट करून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
“बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल”, असा निर्धारही त्यांनी या ट्वीटमधून केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “हे सरकार बेकायदेशीर आहे, लवकरच हे सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील त्यांनी या बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नये.”