रामदास आठवलेंचा शिर्डीसह सोलापूरच्या जागेवर दावा
नांदेड, १७ जानेवारी २०२४ ः देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
रामदास आठवले म्हणाले, राज्यात ४८ जागांमध्ये २ जागा आरपीआयला देण्यात याव्यात. शिर्डी लोकसभा मतदारसंघात लढण्याची माझी इच्छा आहे त्यामुळेच महायुतीने शिर्डीचा विचार करावा. यासोबतच दुसरी जागा विदर्भ किंवा सोलापूरातली द्यावी, त्याचाही विचार महायुतीने केला पाहिजे, राज्यात आरपीआयच्या दोन जागा निवडून आल्या तर पक्षाला मान्यता मिळेल, दोन जागांसाठी आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
तसेच येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण सर्वांनाच देण्यात आलं आहे. राम मंदिर हा धार्मिक कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी गेलं पाहिजे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गेंनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनीही या कार्यक्रमाला यावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. मल्लिकार्जून खर्गे आणि सोनिया गांधी यांनी राम मंदिर कार्यक्रमावर बहिष्कार टाकू नये, जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असंही आठवलेंनी शैलीत म्हटलं आहे.
दरम्यान, शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना भरली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभेचे राजकीय समीकरणे बदलले आहेत. या बदलत्या समीकरणामुळे मात्र महाविकास आघाडी, महायुतीसाठी ही जागा डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसतड आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप