“राम मांसाहारी होता” – जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधक आक्रमक

शिर्डी, ३ जानेवारी २०२३: राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, अस वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे सुरु आहे. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आव्हाड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत होते. अनेक विषयांवर भाष्य करत असताना आव्हाड यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाबाबत रामाबाबत मोठं विधान केलं. या विधानांतर ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत निषेध केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांचं घरच गाठलं आहे. आव्हाडांच्या घरासमोरच कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केल्याचं पाहायला मिळालं आहे.

या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी तत्काळ जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी धाव घेत कार्यकर्त्यांना रोखलं आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजीही केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून यावेळी आव्हाडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी श्रीरामाची प्रतिमा हातात घेत आरती करणार होते मात्र, पोलिसांनी त्याआधीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आल्यानंतर आव्हाडांन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागणार असल्याचं आव्हाड म्हणाले आहेत.