राज ठाकरे जातिवाद पसरविनारे नेते – जितेंद्र आव्हाड
पुणे, ३ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जातिवाद पसरविणारे नेते आहेत. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्याबाबतचा वाद निर्माण करणारे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एकमेव आहेत. यातून त्यांनी सामाजिक ध्रुविकरणाचा प्रयत्न केला. याचा परिणाम काय झाला, तर काकडा आरती बंद झाली. मग तुम्हीच ठरवा जातीवादी कोण? असा सवाल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कऱण्यात आलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आज आव्हाड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद करताना हा सवाल उपस्थित केला. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, दीप्ती चवधरी, रमेश बागवे, मोहन जोशी, वीरेंद्र कराड आदी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच जातिवाद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा महाराष्ट्रातील दैवताचा अपमान होत असताना महाराष्ट्र शांत कसा?. काही लोक महाराष्ट्राचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी सातत्याने छत्रपतींच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. राहुल गांधी देशाला जोडण्यासाठी हजारो किलोमीटर पायी चालत आहेत. इतिहासातील ही सर्वात मोठी पदयात्रा आहे. काही लोक रथयात्रा करतात. मात्र त्याने माणूस जोडला जात नाही. इतिहास पुसला गेला की, भविष्य पुसट होते. म्हणून राहुल गांधी इतिहास सांगत आहेत.’’
संविधान अन काँग्रेसमुळे देश एकसंध
भारतीय संविधानाने अधिकार दिला, तर काँग्रेसने देश उभा केला आहे. काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे. द्वेषाने देश कधीच जोडला जाणार नाही. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. मतभेद विसरून विचारांची देवाण-घेवाण करणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. कोणाला संपविण्याचा विचार कधीच काँग्रेसने केला नाही. त्यामुळे काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकतो. असे मत जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले.