पुण्याची चर्चा तर होणारच – जयंत पाटील

पुणे,६ जून २०२३ः पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याबाबत तडजोड होऊच शकत नाही असा निर्णय काँग्रेसच्या बैठकीमध्ये झालेला असताना आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पुण्यावर चर्चा तर होणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यातच आज पुणे लोकसभेतील बूथ बांधणी मजबूत करण्यासाठी आमदार चेतन तुपे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

शिरूर, जालना आणि भिवंडी या तीन मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, अद्याप कोणत्याही पक्षाने कोणालाही मतदारसंघाची मागणी केलेली नाही. पक्षांतर्गत चर्चा केली म्हणजे मागणी केली असे होत नाही. तिन्ही पक्षात चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ.
पुणे लोकसभेसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा करणार का ? या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, ‘‘पुणे लोकसभेची चर्चा तर होणारच. स्थानिक परिस्थिती बदललेली असते, तिथले नगरसेवक, लोकप्रतिनिधी बदललेले असता, प्रत्येक मतदारसंघात स्थिती बदललेली असताना या तपशिलात पक्षांतर्गत चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ.
सांगली लोकसभेसाठी तुमचे व प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत असल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक वर्ष आहे. उत्साही कार्यकर्ते वेगवेगळ्या नेत्यांची नावे सुचवितात, शेवटी अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील.

शेवटी साहेबच निर्णय घेतील
नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले जात असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘उत्साही कार्यकर्ते असे फ्लेक्स लावतात. पण निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावर हे ठरणार आहे. राष्ट्रवादीतील नेत्यांचे फ्लेक्स लावले, पण त्यासाठी पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. शेवटी मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पवार साहेब घेतील.

तीन आमदारांकडे लोकसभेची जबाबदारी
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तीन आमदारांकडे देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पुणे लोकसभेतील सहा, बारामतीतील खडकवासला आणि शिरूरमधील हडपसर अशा आठ मतदारसंघाची जबाबदारी चेतन तुपे यांच्याकडे दिली आहे. सुनील शेळके यांच्याकडे मावळ मधील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि शिरूरमधील भोसरी, जुन्नर, आंबेगाव, खेड असा एकूण सात सात मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर अशोक पवार यांच्याकडे शिरूरमधील शिरूर हवेली, बारामतीमधील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर या सहा मतदारसंघातील बूथ बांधणीची जबाबदारी दिली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप